
मराठी भाषा नव्हे, तर आपला प्राण आहे!
मराठी भाषा नव्हे, तर आपला प्राण आहे!
डॉ. पी. एस. रामाणी : ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ला सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, अशा अनेक पिढ्या जन्माला आल्या. मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी, ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांनी मांडले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ला सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, ‘मनशक्ती’चे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे, संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शुभा कामथे, ॲड. देवदत्त लाड, विकास होशिंग आदी उपस्थित होते.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने आयोजित ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. ‘सकाळ’चे फीचर्स एडिटर महेंद्र सुके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे यांनी मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री, तर कवयित्री अनघा तांबोळी यांनी तरल काव्यानुभव ‘केवल प्रयोगी’चे सादरीकरण केले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार राजन देसाई यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, दिलीप सावंत, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, आदेश गुरव यांनी परिश्रम घेतले.
----
अन्य पुरस्कार विजेते
महाराष्ट्र टाइम्स, मुक्त आनंदघन, गोवन वार्ता, कालनिर्णय, अधोरेखित, मनशक्ती, श्रमकल्याण युग, शब्दमल्हार, नवरंग रुपेरी, कनक रंगवाचा, पुरुष स्पंदनं, शब्दगांधार, समदा, सह्यांचल, ठाणे नागरिक, संस्कार भक्तिधारा, क्रीककथा, कालतरंग, शैव प्रबोधन, धगधगती मुंबई, निशांत, सत्यवेध, गावगाथा यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
----
मराठीवरील आक्रमण सहन
करू नका : डॉ. लहाने
प्रशासकीय सेवेत असताना रुग्णांची बोलीभाषेत संवाद साधल्याने त्यांच्याशी नाळ जोडता आली. मी कुणीतरी जवळची व्यक्ती आहे, असा विश्वास रुग्णांना वाटू लागलो. मी खेडेगावात मातृभाषेतच शिक्षण घेत नावलौकिक मिळवला. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असली, तरी खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळते. त्यामुळे मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका. मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपला आहे. पूर्वी माणूस शंभर पाने वाचायचा, आता शंभर शब्दसुद्धा ऐकण्याची क्षमता त्याच्यापाशी राहिली नाही, अशी खंत नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.