निधी वाटपावरून आयुक्तांना घेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधी वाटपावरून आयुक्तांना घेराव
निधी वाटपावरून आयुक्तांना घेराव

निधी वाटपावरून आयुक्तांना घेराव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : नगरसेवकांच्या विकास निधी वाटपात पक्षपात करण्यात आला असून, आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात. त्यामुळे निधीचे समान वाटप करा, या मागणीसाठी सोमवारी महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आयुक्तांना घेराव घातला. समान निधी वाटप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी त्यांनी दिला. यावेळी माजी महापौर विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सुजाता सानप, सुजाता पाटेकर, काँग्रेसचे माजी नगरसेवक सुफियान वणू, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव आदी उपस्थित होते.

८ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राज्य आले. यंदाच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभागातील पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आलेल्या ६५० कोटी रुपये निधी वाटपात पक्षपात करण्यात आला आहे, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला. गेल्या काही दिवसांपासून ‘मविआ’चे माजी नगरसेवक व पालिका प्रशासनात विकास निधी वाटपावरून वाद सुरु आहे. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला; तर मविआच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रभागात समान निधीचे वाटप करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांकडून आयुक्तांकडे पाठपुरावा केला जात आहे; मात्र याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. प्रत्येक प्रभागात निधीचे समान वाटप करण्यासंदर्भात आयुक्तांकडून ठोस उत्तर न मिळाल्यामुळे माजी नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालिका आयुक्तांनी आपण पालकमंत्र्यांना कोणतीही सूचना करू शकत नसल्याचे माजी नगरसेवकांसमोर स्पष्ट केले. यावेळी समान निधी वाटपासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

‘पालकमंत्र्यांकडे अधिकार सोपवले’
पालिका अधिनियम १८८ च्या कलम १२९ (अ) अंतर्गत आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात समान निधीचा वाटप करणे आवश्यक आहे. आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार निधीचे वाटप करणे अयोग्य आहे. निधी वाटपाचा अधिकार पूर्णपणे प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांचा आहे; मात्र तो अधिकार त्यांनी पालकमंत्र्यांकडे सोपवल्याचा आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

निधी वाटप
पालिका अर्थसंकल्पात तरतूद - ६५० कोटी रुपये
भाजप (७७ प्रभाग) - २३१ कोटी
महाविकास आघाडी (१५० प्रभाग) - १५० कोटी
नव्याने निवडून येणाऱ्या २२७ नगरसेवक व १० नामनिर्देशित नगरसेवक (प्रत्येकी ६० लाख रुपये) - एकूण १४२ कोटी २० लाख रुपये