
उल्हासनगरात मृत जनावरांसाठी शवदाहिनी
उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : मृत जनावरांसाठी उल्हासनगरात शवदाहिनी उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आल्याने लवकरच मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा प्रश्न मिटणार आहे. गाय, म्हैस, बैल, बकरी, श्वान, मांजर, डुक्कर, गाढव हे मृत झाल्यावर जागेवरच पडून राहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असते. पालिका जमिनीत खड्डा खोदून मृत जनावरांना पुरते. बऱ्याचदा मृत जनावरे डम्पिंग ग्राऊंडवरही टाकण्यात येतात. जनावरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत. त्यासाठी शवदाहिनीची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणे यांच्याकडे केली होती. याबाबत केणे यांनी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांचे लक्ष वेधले होते.
पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या ९८ लाखांच्या फंडातून मृत जनावरांसाठी शवदाहिनी उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.