
गुरु नानक महाविद्यालयात विविध कार्यक्रम
धारावी (बातमीदार) : गुरू नानक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. २७) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताच्या समूह गायनाने झाली. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पोवाडा, भजन, नृत्य आणि कविता वाचन असे विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. गुरू नानक वैद्यक सोसायटीचे प्रशासक हरभजन कौर आनंद यांनी मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले; तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांनी मराठी भाषेची गोडवी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने कुसुमाग्रज यांच्या कविता आणि कुसुमाग्रज यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रदर्शन भरवले होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय विभागप्रमुख प्राध्यापक अनुराधा नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.