
आदिवासी मुलांची जीवाची मुंबई
मोखाडा, ता. २८ (बातमीदार) : देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईचे आकर्षण सर्व जगाला आहे. मुंबई पाहण्याचे कुतुहल सर्वांनाचा आहे; मात्र मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील अनेक आदिवासी अबालवृद्धांनी अजूनही मुंबई पाहिलेली नाही. त्यांचे स्वप्न साकारण्याठी करोळ-पाचावरचे सरपंच नरेंद येले आणि जाणीव संस्थेने पुढाकार घेतला. आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीला त्यांनी मुंबईदर्शन घडवले आहे. या वेळी सर्वांनी मनसोक्त आनंद लुटत आपल्या जिवाची मुंबई केली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी शेती, मजुरी याच गर्तेत अडकलेले बहुतांश आदिवासी कुटुंब तसेच आपले गाव आणि तालुका या पलीकडे काहीही न पाहिलेले हजारो विद्यार्थी मोखाडा तालुक्यात आहेत. अशा विद्यार्थी आणि पालकांना जग कळावे, त्यांनाही स्वप्ननगरी मुंबई पाहायला मिळावी म्हणून करोळ-पाचावरचे सरपंच नरेंद येले आणि जाणीव संस्थेने आयोजन केले. पालघर जिल्हा परिषद शाळेतील ३५ विद्यार्थी, २५ पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि शिक्षकांची मुंबई सहल घडवून आणली आहे.
-------------------------
बाह्य जगाचे ज्ञान मिळण्यासाठी आयोजन
विद्यार्थी व पालकांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, राणीची बाग यासह अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहिली. तसेच समुद्राच्या पाण्यात उतरून मनसोक्त आनंद लुटत जीवाची मुंबई केली आहे. माझ्या भागातील अनेक पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मुंबई पाहिलेली नव्हती. त्यांना बाह्य जगाचे ज्ञान मिळावे, जीवनाचा आनंद कळावा म्हणून जाणीव संस्थेचे अजय, मनोज पांचाळ यांच्या सहकार्याने आपण विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन समितीची मुंबई सहल घडवून आणल्याचे सरपंच नरेंद येले यांनी सांगितले.