
बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात तुर्भे वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जवळपास १३२ वाहनचालकांकडून जवळपास १ लाख १२ हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २७ वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित केले गेले आहेत.
नवी मुंबई वाहतूक शाखेकडून वाहतूक सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, त्यानंतरदेखील अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून तुर्भे वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट प्रवास करणारे ९५ दुचाकीस्वार, सिग्नल जम्पिंग करणारे २७, मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या १० दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे; तर तीन दिवसांत २७ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
------------------------------------------------
एकाच दिवशी २४५ जणांवर कारवाई
नेरूळ, सानपाडा, जुईनगर, तुर्भे रेल्वे स्टेशन बाहेरील रस्ते, सानपाडा दत्त मंदिर सर्व्हिस रोड, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरूळसमोरील गॅरेजचा परिसर, रूपारेल सर्कल व हावरे सेंच्युरियन मॉलसमोरील रस्त्यांवर नो पार्किंगची कारवाई करण्यात आली आहे; तर तुर्भे वाहतूक शाखेने रविवारी (ता. २६) एकाच दिवशी तब्बल २४५ जणांवर कारवाई केली आहे.
----------------------------------------------
वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांविरोधात पुढील काळातदेखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- नितीन गिते, प्रभारी पोलिस निरीक्षक, तुर्भे