भिवंडी महापालिकेत कागदपत्रे बेवारस स्थितीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी महापालिकेत कागदपत्रे बेवारस स्थितीत
भिवंडी महापालिकेत कागदपत्रे बेवारस स्थितीत

भिवंडी महापालिकेत कागदपत्रे बेवारस स्थितीत

sakal_logo
By

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह पालिकेच्या पाचही प्रभागांत सध्या सावळागोंधळ सुरू असून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने भोंगळ कारभार सुरू आहे. प्रभाग कार्यालयात कागदपत्रे व नसत्या गायब झाल्याने विविध प्रकारच्या कारवाया थंडावल्या असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडी महापालिकेच्‍या सहामजली कार्यालयात अधिकारी आणि विविध विभागीय कार्यालये स्थापन करण्‍यात आली आहेत. पालिकेची महत्त्‍वाची कागदपत्रे प्रत्येक विभागीय कार्यालयात आणि इतर ठिकाणी ठेवली जातात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मुख्य कार्यालयातील पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या शेजारी नागरिकांची कागदपत्रे बेवारस स्थितीत पडली असून, त्या मजल्यावर असलेल्या आस्थापना विभागाने देखील या कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या आणि पालिकेच्या महत्त्‍वाच्या कागदपत्रांची हेळसांड सुरू असून याकडे कार्यालयीन विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

कार्यालयीन कारवाईला अडथळा
भिवंडी महापालिकेच्या पाच प्रभाग समित्‍या असून, प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात कागदपत्रांची हेळसांड सुरू आहे. अनेक वेळा मुख्य कार्यालयातून आलेली कागदपत्रे प्रभाग कार्यालयात मिळत नाहीत; तर नागरिकांच्या व करदात्यांच्या महत्त्‍वाच्या कागदपत्रांच्या नसत्‍या गायब झालेल्या आढळून येत आहेत. त्यामुळे प्रभाग कार्यालयातील कारवाईला अडथळा निर्माण झाला आहे.
-------------------------------
आयुक्‍तांनी लक्ष देण्‍याची मागणी
प्रभाग कार्यालयात प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार असल्याने बेजबाबदारपणे वस्तुस्थिती हाताळली जात आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता माहिती उपलब्ध नसल्याचे अथवा न पटणारे उत्तर दिले जाते. त्यामुळे बेशिस्त सुरू असलेल्या कारभारास पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शिस्त लावावी, अशी मागणी शहरातील करदात्या नागरिकांकडून केली जात आहे.
-------------------------------------------
कोट
महापालिकेच्‍या कागदपत्रांची हेळसांड न करता महत्त्‍वाच्या कागदपत्रांच्या नस्तींची व्यवस्थित जपणूक करण्यासाठी संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक लावून त्यांना आदेश देण्याची कारवाई करण्यात येईल.
- दीपक पुजारी, उपायुक्त (मुख्यालय)
महापालिका, भिवंडी