आयरेत घराने अडविला डीपी रोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयरेत घराने अडविला डीपी रोड
आयरेत घराने अडविला डीपी रोड

आयरेत घराने अडविला डीपी रोड

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : कच्च्या मातीच्या रस्त्यावरुन पायपीट करणाऱ्या आयरेवासीयांना सिमेंट काँक्रीटचा रस्ता मिळाला आहे. या रस्त्याचे ७० टक्के कामही पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्यात एक घर आडवे आले असून या घराने डीपी रस्त्याची वाट अडवली आहे. आयरे गावातील अनधिकृत चाळीतील घरांनी येथील बालाजी गार्डन गृहसंकुलातील डीपी रस्त्याची वाट गेले अनेक वर्षे अडवली आहे. येथील रहिवाशांनी सातत्याने लढा दिल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने कारवाई करत रस्त्यात येणाऱ्या चाळीतील घरांवर हातोडा चालविला. त्यानंतरही निधी अभावी हा रस्ता रखडला होता.

कोपर रेल्वे स्थानकालगत असलेल्या डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात नागरिकीकरण वाढत असून गृहसंकुले उभी राहत आहेत. या भागात अनधिकृत चाळींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असून या चाळी तोडून त्या ठिकाणी आता इमारती उभ्या रहात आहेत. या अनधिकृत चाळी, इमारतींमुळे रस्ता, पाणी या सुविधांची या भागात बोंब आहे. २००९ मध्‍ये आयरे गावात बालाजी गार्डन हे गृहसंकुल उभारले गेले. या संकुलात हजारोंच्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. अलिशान घर मिळाले; परंतु मुलभूत सुविधांपासून आजही येथील नागरिक हे वंचित असल्याचे दिसतात.
-------------------------------
हक्काचा रस्ता नाहीच!
आयरे गाव मुख्य रस्ता ते बालाजी गार्डन व पुढील भागात वाढणाऱ्या चाळ, इमारत परिसरामध्ये जाण्यास पक्का रस्ता नाही. कच्च्या पायवाटेने येथील नागरिक ये-जा करतात. गृहसंकुलाच्या आराखड्यात असलेला हक्काचा रस्ता अद्याप या नागरिकांना मिळालेला नाही. मंजूर डीपी रस्त्यात अनधिकृत चाळ येत असून या चाळीतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने गेले अनेक वर्षे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी गृहसंकुलातील नागरिक वारंवार आमदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत होते. परंतु, आश्वासनांपलिकडे त्यांना काही मिळत नव्हते. अखेर चार-पाच वर्षापूर्वी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.
--------------------------------------------
मार्गात अडसर...
चाळीतील रहिवाशांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर या चाळीतील रस्त्यात येणारी चार घरे पाडण्याचा निर्णय घेतला गेला. यातील तीन घरे पाडण्यात आली असून एका घराचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ आहे. कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे तोडण्याचा पालिका प्रशासनाने सपाटा लावल्यानंतर या अनधिकृत चाळीतील तीन घरेही पालिकेने जमीनदोस्त केली.

श्री आशीदेवी मंदिर ते बालाजी गार्डन या रस्त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून २५ लाख व खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या खासदार निधीतून २५ लाख असा ५० लाखाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला. मागील वर्षी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले. हे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्येच एक घर आल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. हे घर हटत नाही तोपर्यंत रस्ताही पूर्ण बनवू शकत नाही, असे कंत्राटदार सांगतो.
------------------------------
मनसे, भाजपकडून सातत्याने पाठपुरावा
रस्त्याचे काम करण्यासाठी घरे पाडण्याचे काम हाती घेतल्यानंतर एका घराचा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ असल्याची बाब प्रभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात आली असल्याची बाब खासगी सुत्रांनी दिली. सातत्याने प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर देखील याचा परिणाम होत असून रखडलेला हा रस्ता याचे उदाहरण आहे. मनसे व भाजपकडून याचा सातत्याने पाठपुरावा घेतला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणापुढे त्यांचेही काही चालेनासे झाले आहे. अनधिकृत चाळी उभ्या राहतानाच त्यावर कारवाई का केली जात नाही, अशी मागणी जागरुक नागरिकांकडून केली जात आहे.
----------------------------
कोट
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. संबंधित तक्रारदारांना न्यायालयाने नोटीस दिली असून, लवकरच हे प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा निकाल येताच रिकामे घर पाडून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
-संजय साबळे, सहायक आयुक्त, ग प्रभाग क्षेत्र, केडीएमसी