
अनैतिक संबंधातून मानखुर्दमध्ये एकाची हत्या
मानखुर्द, ता. २८ (बातमीदार) ः मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरनजीक असलेल्या भीमनगर परिसरात रविवारी (ता. २६) सकाळी रफिक मोमीन याच्यावर त्याच परिसरातील आरोपीने प्राणघातक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या रफिकवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी (ता. २७) त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
भीमनगरमधील रहिवासी रफिकचे परिसरातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती त्या महिलेच्या पतीला होती. त्याच्या मनात रफिकविषयी राग होता. रविवारी सकाळी भीमनगर येथे चीता कॅम्प महाराष्ट्र नगर रस्त्याच्या कडेला त्यांच्यात याच विषयावरून वाद झाला. त्यावेळी त्याने रफिकला मारहाण केली; तसेच सोबत आणलेल्या चाकूने त्याच्या पोटावर व दंडावर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या रफिकला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवला होता; परंतु उपचार सुरू असताना रफिकचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचे कलम त्या गुन्ह्यात नोंदवण्यात आले. याचा तपास उपनिरीक्षक मनोज ठाकूर करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.