
मराठी भाषा विश्वव्यापी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : मराठी भाषा ही वैश्विक झाली आहे, त्यामुळे आज जरी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असलो तरी मराठी भाषा ही कधीच लोप पावणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. कवितेचे कार्यक्रम करीत अमेरिकेसह अन्य देशात फिरतो तेव्हा मराठी कविता ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे मराठी भाषा ही विश्वव्यापी झाली असल्याचेही ते म्हणाले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या संकल्पनेतून निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात प्रा. डॉ. प्रज्ञा पवार, पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, कवयित्री संजीवनी तडेगावकर, आप्पा ठाकूर, प्रा. अनंत राऊत, अशोक कोतवाल, गझलकार संदीप माळवी, प्रशांत डिंगणकर सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासह कवी महेश केळूसकर आणि विजय चोरमारे यांनीदेखील कविता सादर केल्या.
‘अस्मानिकांनो हीच आहे निर्वाणीची वेळ
जात-पात आणि उच्च-नीच हा बंद करुया खेळ
हवे कशाला जात दाखले आणि जातीचे मूळ
या आप्पा ठाकूर यांनी जाती-पातीतील भेदभावांवर आधारित कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली.
नशिबा तुझ्या हवाली... करणार डाव नाही
मागे फिरावयाचा माझा स्वभाव नाही
गझलकार संदीप माळवी यांनी सादर केलेल्या गझलेने उपस्थितांची वाहवा मिळविली.