मिरा-भाईंदरमधील खासगी इमारतीही होणार हरित ?

मिरा-भाईंदरमधील खासगी इमारतीही होणार हरित ?

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या मिरा रोड येथील विपश्यना केंद्र या इमारतीला नुकताच हरित इमारत हा बहुमान प्राप्त झाला आहे. आता शहरातील नव्याने बांधण्यात येणाऱ्‍या खासगी इमारतीदेखील हरित इमारती व्हाव्यात, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात शहरातील विकसकांसोबत १ मार्चला विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भारतीय हरित इमारत परिषद विकसकांना मार्गदर्शन करणार आहे.
इमारत बांधत असताना इमारतीत नैसर्गिक प्रकाशाचा वापर अधिक होईल, पाणी तसेच ऊर्जाबचत होईल, प्रदूषणदेखील कमी होईल, अशा रीतीने इमारतीचे आराखडे तयार करून तशी बांधणी, इमारतीच्या आवारात जास्तीत जास्त झाडांची लागवड, असे हरित इमारतीचे निकष पाळणे गरजेचे आहे. या निकषाचे पालन केल्यास अशी इमारत हरित इमारत ठरत असते. महापालिकेच्या मिरा रोड येथील विपश्यना केंद्राची उभारणी करताना याची विशेष दक्षता घेण्यात आल्यामुळे भारतीय हरित इमारत परिषदेने ही वास्तू हरित इमारत म्हणून घोषित केली आहे. आता यापासून स्फूर्ती घेऊन शहरातील खासगी विकसकांनीदेखील आपल्या इमारती हरित इमारती होतील, याची दक्षता घ्यावी यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे शहरातील विकसकांना एक मार्चला बोलावण्यात आलेल्या एका विशेष बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूद, हरित इमारतीचे निकष यासंदर्भात भारतीय हरित इमारत परिषद तसेच महापालिका अधिकाऱ्‍यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
....
प्रोत्साहन देण्याचा निर्णय
राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावलीत हरित इमारतीसाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार हरित इमारत बांधणीसाठी विकसकाला एकूण क्षेत्रफळाच्या तीन टक्के इतके अतिरिक्त चटई क्षेत्रफळ मंजूर करण्याची सुविधा आहे. त्याचा विकसकांनाही फायदा होतो व पर्यावरणसंवर्धनालाही हातभार लागतो; पण विकसकाने अतिरिक्त चटई क्षेत्रफळ मंजूर करवून घेतल्यानंतर हरित इमारतीचे निकष पाळले नाहीत, तर इमारतीच्या क्षेत्रफळाच्या किमतीच्या दुप्पट एवढा दंडही आकारण्याची नियमावलीत तरतूद आहे. नियमावलीतील तरतुदीचा फायदा घेऊन अधिकाधिक विकसकांनी हरित इमारती बांधाव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com