ओवळा माजीवड्यालाही क्लस्टरचे वेध

ओवळा माजीवड्यालाही क्लस्टरचे वेध

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्ती असलेला परिसर म्हणून ओवळा- माजीवडा ओळखला जात असला तरी आता या विधानसभा मतदारसंघालाही क्लस्टरचे वेध लागले आहेत. येथील टोलेजंग इमारतींच्या गर्दीमध्ये विजयनगर, शास्त्रीनगर, भीमनगर, लक्ष्मी-चिराग नगर, कोकणी पाडा, गांधीनगर, नळपाडा आदी भागांमध्ये झोपडपट्ट्या आणि अनधिकृत धोकादायक इमारती असून त्यांच्या पुनर्विकासाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनाही क्लस्टर दिलासा देण्यात यावा, असे साकडे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.

धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देणारी क्लस्टर योजना ठाण्यात लागू झाली आहे. महापालिकेच्या मंजूर १२ आराखड्यांना मान्यता दिल्यानंतर सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. भूमिपूजनाला वर्ष उलटल्यानंतर आता केवळ प्रत्यक्ष कामाची वीट कधी रचणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, क्लस्टरवरून ठाण्यात पुन्हा राजकारण पहायला मिळत आहे. केवळ आपल्या लोकमान्यनगर मतदारसंघाची निवड क्लस्टरमध्ये व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

आता ओवळा-माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विजयनगर, शास्त्रीनगर, भीमनगर, लक्ष्मी-चिराग नगर, कोकणी पाडा, गांधीनगर, नळपाडा व घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील झोपडपट्ट्या व अनधिकृत बांधकामांचा क्लस्टर योजनेत समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या परिसरात घोडबंदर पट्ट्यासारखा सर्व सोयीसुविधांनी सज्ज असा भाग येतो. मोठमोठे गृह प्रकल्पही उभे राहत आहेत. पण तरीही येथील झोपडपट्ट्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे.
----------------------------------------------
स्वप्नातील घरे साकारण्यास मदत
मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा विचार करता जो दर मुंबईच्या विकसकांना मिळत असतो तो दर ठाणे शहराखेरीज महानगरपालिका क्षेत्रातील इतर भागांमध्ये मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी विकसक पुढे येत नाहीत अथवा सामोरे आलेच तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे ओवळा- माजीवडा विधानसभा मतदारसंघाचा कायापालटही क्लस्टरच्या माध्यमातून करून येथील सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे साकार करण्यास मदत करावी, असे निवेदनाचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
-----------------------------------
क्लस्टरच लाभदायी
-झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर कसे लाभदायी आहे, याचे मुद्दे मांडून ते पटवून देण्याचा प्रयत्न आमदार सरनाईक यांनी केला आहे.
-झोपु योजनेमध्ये झोपडपट्टीवासीयांना २००० पूर्वीचा वास्तव्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. त्यामुळे सुमारे २५ ते ३० टक्के झोपडपट्टीधारक हे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये समाविष्ट होत नसल्याने या योजनेला गती मिळत नाही.
- झोपूमध्ये २००० पर्यंतचे तर क्लस्टर योजनेमध्ये २०२० चा वास्तव्याचा दाखला ग्राह्य धरण्यात येतो.
- झोपडीधारकांची मोठ्या परिवारानुसार कितीही मोठी जागा असल्यास झोपु योजनेअंतर्गत त्यांना फक्त नियमानुसार २७९ चौरस फुट क्षेत्रफळाचे घर मिळत असते. पण क्लस्टर योजनेमध्ये जेवढे घराचे क्षेत्रफळ असते त्यानुसार बाधीतांना घर दिले जाणार आहे.
--------------------------------------------
झोपडपट्टीवासियांचा क्लस्टरकडेच कल
एसआरए योजनेमध्ये पहिल्‍या व दुसऱ्या मजल्यावर ज्याचे घर असेल त्याला या योजनेमध्ये ग्राह्य धरले जात नाही. पण क्लस्टर योजनेमध्ये पहिला अथवा दुसरा मजला असणाऱ्यांना घर दिले जाणार आहे. तसेच वाढीव क्षेत्रफळाची आवश्यकता असल्यास नियमानुसार विकसकाला द्यावे लागणार असल्याने झोपडपट्टीवासीयांचा क्लस्टर योजनेकडे अधिक कल असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com