
मोक्क्यातील दोन आरोपींना दहा वर्षे सश्रम कारावास
ठाणे, ता. २८ : रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दोघांना ठाणे विशेष मोक्का न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी मोक्कांतर्गत दोषी ठरवले. तसेच त्यांना दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
अजीज अब्बास ऊर्फ जाफर सय्यद ऊर्फ जाफरी, जाफर आजम सय्यद आणि त्यांचे दोन साथीदार वेगवेगळ्या मोटरसायकलवरून येत, महिलांना पुढे खून झाल्याची बतावणी करत दोघे दुसऱ्या मोटरसायकलवरून येत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन जात. २ जुलै २०१६ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या प्रकारात दक्ष नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. याप्रकरणी तत्कालीन कल्याण गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्राथमिक अहवाल सादर केल्यावर तत्कालीन सहायक आयुक्त व सेवानिवृत्त अधिकारी व्ही. एन. फुलकर यांनी गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन ठाणे शहर पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मंजुरीने मोक्का दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात केला होता.