वीज दरवाढ प्रस्तावाची होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज दरवाढ प्रस्तावाची होळी
वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

sakal_logo
By

पालघर, ता. २८ (बातमीदार) : राज्यात वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरण कंपनी विजेच्या दरामध्ये सरासरी ३७ टक्के वाढ करत आहे. प्रति युनिट २.५५ रुपयांची प्रचंड वाढ होणार आहे. गेल्या २३ वर्षातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी, छोटे उद्योगधंदे आदींवर अन्याय होणार आहे. महावितरणच्या या वीज दरवाढी विरुद्ध पालघरच्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर महावितरणच्या प्रस्तावाची मंगळवारी होळी करण्यात आली.
महावितरण कंपनीने रेकॉर्ड ब्रेक दरवाढीची केली आहे. या दरवाढीमुळे सरासरी २ .५५ रुपये प्रति युनिट इतकी वाढ आहे. स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्ही आकारात वाढ होणार आहे. वीज नियामक आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षात प्रथमच करण्यात आलेली ही प्रचंड दरवाढ आहे. कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करता कामा नये, असे विद्युत अपीलीय प्राधिकरणाचे आदेश आहेत. पण या आदेशांना हरताळ फासून ही दरवाढ महावितरण मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही होणारी दरवाढ अन्यायकारक असून या विरोधात पालघरच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरण पालघर कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून वीज दरवाढ प्रस्तावाची होळी केली. संघटनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांना दरवाढ रोखण्याचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लवेकर, उपाध्यक्ष सुभाष मोरे, सचिव निखिल मेस्त्री, सह सचिव चंद्रकांत साखरे, अरविंद पाटील, संजय पाटील, दीपक भंडारी, राजू मोर्या, गणेश तांबडी, अनिल पाटील, हरेश्वर निजप, मिलिंद म्हात्रे, केतन चौधरी, राजाराम म्हात्रे, विष्णू जाधव, भारत पागी, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शेतकरी,वीज ग्राहक आदी आंदोलनाला उपस्थित होते.
.....
पालघर : महावितरणच्या कार्यालयाजवळ वीज ग्राहकांनी आंदोलन करत वीज दरवाढ प्रस्तावाची होळी केली.