‘मध्य वैतरणा’चे पाणी पुन्हा पेटणार

‘मध्य वैतरणा’चे पाणी पुन्हा पेटणार

मोखाडा, ता. २८ (बातमीदार) : मुंबईसह उपनगरांची तहान भागवण्यासाठी मोखाड्यात मध्य वैतरणा धरण ११ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मात्र, प्रकल्पग्रस्तांसह लगतच्या बाधित आदिवासी गावपाड्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी आपल्या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी प्रशासनासह आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसह धरण प्रकल्पालगतच्या आदिवासी पाड्यांतील नागरिक २ मार्चला मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच एक दिवसाचे धरणे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार आहे. त्यामुळे मध्य वैतरणा धरणाचे पाणी पुन्हा पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मोखाड्यातील मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याने मुंबई आणि उपनगरांची तहान भागली आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त आणि लगतच्या आदिवासी गावपाड्यांचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. या धरणालगत असलेल्या कारेगांव, कडुचीवाडी आणि कोचाळे गावांसाठीची नळपाणीपुरवठा योजना आजही अपूर्ण आहेत. त्यामुळे येथील आदिवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रकल्पग्रस्त आदिवासींना मुंबई महापालिकेने सेवेत घेतलेले नाही. गावपाड्यांसाठी केलेल्या नळपाणीपुरवठा योजनेत धरणाखाली विहीर खोदण्यास महापालिकेने मनाई केली होती. मात्र, याच ठिकाणी इको सेन्सेटिव्ह झोन असताना महापालिकेने चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच धरणाच्या बाजूला वन्यक्षेत्रात खड्डे, ड्रेनेज टॅक, गटारे खोदण्यात आले आहेत. तसेच धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कमी उंचीची संरक्षक भिंती बांधण्यात आली आहे. त्याकडे वनविभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी २०२१ मध्ये ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याबरोबर बैठक झाली होती. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन देण्यात आले होते. तसेच शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी ही प्रकल्प ग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आश्वासित केले होते.
....
दोन वर्षांनंतरही कार्यवाही नाही
दोन वर्षे उलटूनही त्यावर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी कार्यवाही केलेली नाही. आदिवासीच्या तोंडाला पाणी पुसल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कारेगांव, कडुचीवाडी, कोचाळे, करोळ, पाचघर आणि वावळ्याचीवाडी येथील प्रकल्पग्रस्तांनी २ मार्चला मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन करणार आहेत.
...
आम्ही वारंवार मागणी करूनही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही. प्रकल्पग्रस्तांना महापालिकेने नोकरी दिलेली नाही. नळपाणीपुरवठा योजना ही सदोष असल्याने आम्हाला पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे अखेर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मिलिंद बदादे, ग्रामपंचायत सदस्य, कोचाळे
....
गावासाठी तयार केलेली नळपाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची असून त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. आतापर्यंत ३२ प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत घेतले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांची भरती प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. तसेच किनिस्ते फाटा ते धरण या रस्त्यावर संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
- प्रवीण बांबळे, दुय्यम अभियंता, मध्य वैतरणा धरण, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com