महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा डंका
महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा डंका

महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा डंका

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : पनवेल महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. २७) सर्व शाळांमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मराठी गीत गायन, निबंध कविता वाचन, स्वरचित कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन, कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, भाषिक खेळ, मराठी भाषेतील विनोद इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख व्हावी, या हेतूने त्यांचे जीवन चरित्र, त्यांनी केलेल्या कवितांचे वाचन शिक्षकांनी केले. याचबरोबर सर्व शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये लोकनेते दि. बा. पाटील इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. शाळा क्रमांक ८ येथे पिल्लई महाविद्यालयातर्फे शालेय वाचनालयासाठी मराठी गोष्टींची पुस्तके देण्यात आली. शाळा क्रमांक १० मधील ‘नाविन्यपूर्ण फुगडी’ हा खेळ खेळून मराठी भाषा गौरव दिन सादर केला. प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन यांच्या कल्पक मार्गदर्शन व सकारात्मक प्रोत्साहनामुळे मराठी भाषा गौरव दिन विद्यार्थी-शिक्षक, पालकांनी मोठ्या दिमाखात साजरा केला.

विमला तलाव येथे रंगले कवी संमेलन
उरण, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य भाषा दिन व कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा आणि मराठी भाषेविषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी, त्याची जनजागृती व्हावी या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था व कोमसाप उरण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. २७) शहरातील विमला तलाव येथे संध्याकाळी ६ वाजता मराठी कवी संमेलन पार पडले.
कवी संमेलनाप्रसंगी कवी सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, एल. बी. पाटील, भ. पो. म्हात्रे, राम म्हात्रे, अजय शिवकर, संजय होळकर, संग्राम तोगरे, मनोज ठाकूर, जयवंत पाटील, दौलत पाटील, केसारीनाथ ठाकूर, रामचंद्र म्हात्रे आदी कवींनी मराठी भाषेत कविता, गाणे, चारोळी, गझल सादर करत मराठी भाषेचा इतिहास, भाषेचे महत्त्व विशद केले. प्रत्येक कवींनी अतिशय सुंदर आवाजात कविता गात रसिकांची मने जिंकली. या वेळी प्रत्येक कवी व ज्येष्ठ नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ॲड. गोपाळ शेळके, संजय होळकर, केसरीनाथ ठाकूर, संग्राम तोगरे, दिनानाथ कोळगावकर या मान्यवरांना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर यांनी, तर आभार विठ्ठल ममताबादे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, सदस्य सादिक शेख, आकाश पवार, ओमकार म्हात्रे, अक्षय कांबले, निकिता पाटील, सानिका पाटील, तेजस सनस आदींनी विशेष मेहनत घेतली.

राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
खारघर (बातमीदार) : मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी, संस्कृती टिकवण्यासाठी मराठी राजभाषा दिनानिमित्त शिव-आधार सामाजिक सेवा संस्था, कुटुंब फाउंडेशन आणि पुरंदर-स्नेह ग्रंथसंग्रहालाय यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थी मोठ्या संख्येते सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित पालकांनी स्पर्धेमुळे मुलांमध्ये बुद्धीला चालना मिळते, स्पर्धेचे महत्त्व मुलांना समजते, असे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र मोरे, सदानंद शिरसकर, सागर घोरपडे, संपत गवळी, अश्विनी घोरपडे, ग्रंथपाल वर्षा शिरसकर यांनी विशेष प्रयत्न केले.

सानपाड्यातील विवेकानंद संकुलात कविता सादरीकरण
जुईनगर (बातमीदार) : मराठी राजभाषा दिनानिमित्ताने प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुलात प्रथमच शाळेतील पालकांच्या साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कविता स्वतः लिहून सादर केल्या. पालकांनीही स्वरचित कविता आणि बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज यांच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमासाठी सुलेखनकार विलास समेळ, कवी शंकर गोपाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक गजानन साठे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा देशपांडे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.