
कोरोना योद्धे उद्या मंत्रालयावर धडकणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सरकारी नोकरीत कोरोना योद्ध्यांना सामावून घ्या, कोरोना भत्ता अन् बोनस द्या, कोविड योद्ध्यांना सैनिकांचा दर्जा द्या, आदी मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २) राज्यातील कोरोना योद्ध्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. जे. जे. रुग्णालय सिग्नल, रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी येथून सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघून आझाद मैदानात पोहोचणार आहे.
कोरोना काळात राज्यातील आरोग्य यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे रुग्णालयांतील व्यवस्था गंभीर होती. प्रशिक्षित कर्मचारीही गोंधळलेल्या अवस्थेत होते. अशा वेळी रुग्णांच्या मदतीला रुग्णसेवक धावून आले; मात्र कोरोनाची लाट ओसरताच या योद्ध्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. हे करोना योद्धे अख्ख्या महाराष्ट्रभर पसरले आहेत. या सर्वांना एकत्र करून त्यांना न्याय व अधिकार मिळवून देण्याचा निश्चय म्युनिसिपल कामगार एकता युनियनने केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड योद्ध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देऊन कायम करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीच कृती केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना घोषणेची आठवण करून देण्यासाठी २ मार्च रोजी म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातून कोविड योद्धे मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती म्युनिसिपल कामगार एकता युनियनचे अध्यक्ष कॉ. मनोज यादव आणि सरचिटणीस कॉ. जगनारायन गुप्ता यांनी दिली.