प्रलंबित मागण्यांवरून माथाडी आक्रमक

प्रलंबित मागण्यांवरून माथाडी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२८ : माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसात सोडवण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. मात्र, आजतागायत आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी संघटना व तमाम माथाडी कामगारांतर्फे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आगामी काळात मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन, महसुल, नगरविकास व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी १ फेब्रुवारीला राज्यातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला होता. या आंदोलनानंतर सुरेश खाडे यांनी २७ फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंतकुमार सरंगल, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक विभाग ) निसार तांबोळी आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी खाडे यांनी माथाडी कामगारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्याची पुर्तता झाली नसल्याने येत्या १० ते १५ दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
-------------------------------------
माथाडी कामगारांचे प्रश्न
माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी, सल्लागार समितीच्या वेळावेळी संयुक्त बैठका घ्याव्या, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून त्यावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांची भरती करावी, माथाडी कामगारांना नवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत घरे मिळणे, माथाडी कामगार कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेला चेंबूर येथे दिलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, असे अनेक प्रश्न शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com