
एपीएमसीतील गुटखा विक्रेत्यांची धरपकड
नवी मुंबई, ता.२८ (वार्ताहर) : एपीएमसी मार्केटमध्ये गुटख्याची विक्री करणाऱ्या पाच पान टपऱ्यांवर एपीएमसी पोलिसांनी छापे मारून राज्यात प्रतिबंधीत असलेला हजारोंचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पाचही पानटपरी चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री करण्यास बंदी असतानाही एपीएमसी मार्केटमधील पानटपरी चालकांकडून सर्रास गुटखा विकण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एपीएमसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता.२४) वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या सुचनेनुसार एपीएमसी मार्केटमधील पान टपऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी सेक्टर-१९ मधील सत्रा प्लाझा समोरील ए-१ पान शॉप या टपरीवर छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा सापडला असून टपरी चालक इंद्रजित यादव (३१) याला ताब्यात घेतले. त्यानंतर बाजुलाच असलेल्या ओम पान शॉपची तपासणीत देखील दोन हजारांचा गुटखा आढळून आला असून पोलिसांनी अहमद शहबान अली अन्सारी (३०) या पान टपरी चालकाला ताब्यात घेतले. तर आणखी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत टपरी चालक संजय कुमार गुप्ता (३२), मेहमूद मंजुर अहमद (२१) आणि अरविंद चौहाण (३५) याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व पानटपरीचालकांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.