होळी, धुळवडीसाठी बाजारपेठा सजल्या

होळी, धुळवडीसाठी बाजारपेठा सजल्या

जुईनगर, ता. १ (बातमीदार)ः कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर यंदा सर्वत्र होळी, धूलिवंदन निर्बंधमुक्त पद्धतीने साजरा होणार आहे. त्यामुळे आत्तापासून होळी-धूलिवंदनाचा आनंद साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेसह शहरातील बाजारपेठा सणानिमित्त सजल्या असून नवी मुंबईकरांचा उत्साह आत्तापासूनच शिगेला पोहोचला आहे.
नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये बाळगोपाळांसह नागरिकांची रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने सर्व प्रकारच्या रंगांच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारपेठेसह वाशी, सानपाडा, नेरूळ येथील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, दोन प्रकारचे स्प्रे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. मिनी थंडर व थंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्याचबरोबर बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या पिचकाऱ्यांना लहान मुलांची अधिक पसंती मिळत आहे.
-----------------------------------------------------------
कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची क्रेझ
गेल्या वर्षीपेक्षा यंदा नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहेत. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची क्रेझ अधिक आहे. त्यात पब्जी या खेळाची पिचकारी, विविध आवाज येणाऱ्या पिचकारीसोबत कार्टूनला अधिक मागणी आहे. साधारण २५० पासून ५०० रुपयांपर्यंत बाजारात पिचकाऱ्या उपलब्ध आहेत.
-------------------------------------------------------
नैसर्गिक रंगांना पसंती
सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू आहे. ग्राहक नैसर्गिक रंगाला जास्त पसंती देत आहेत. तसेच लहान मुले कार्टून पिचकारीला पसंती देत असून रंगाचे पोते १०० रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत मिळत आहे. टॉपगन, वॉटर टँक व पिचकारी ५० ते १०० रुपयांपासून ते ५०० रुपये अशा किमतींमध्ये उपलब्ध आहे.
----------------------------------------------------
‘भैय्या रंग’ही बाजारात
हॅपी होली लिहिलेली वैविध्यपूर्ण पिवळ्या रंगाची टोपी, तसेच तोंडावर, डोळ्यांना अपायकारक नसणारा छुमंतर हा कलरदेखील आकर्षण ठरत आहे. पिचकारीमध्ये टाकण्यासाठी परफ्युम लिक्विड रंगही उपलब्ध आहेत. केमिकल रंग म्हणून ओळखला जाणारा ‘भैय्या रंग’ हा दोन-तीन दिवस शरीरावर तसाच राहतो. त्यामुळे भैय्या रंगाला मागणी कमी आहे. साधारणत: १०० ते १५० रुपयांपर्यंत त्याचा दर आहे.
--------------------------------------------------------
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच होळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आतापासून ग्राहकांची गर्दी होत आहे.
- हैदर शेख, रंगविक्रेते, एपीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com