
वृद्ध व्यक्तीला भामट्यांनी लुबाडले
नवी मुंबई (वार्ताहर): वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीतून मिळालेली ७५ हजारांची रोख रक्कम घेऊन पायी चालणाऱ्या एका वृद्धाला दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना महापेत घडली आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसीत गुन्हा दाखल आहे.
महापेतील अडवली-भुतवली गावात राहणारे लाकड्या भिवा खानझोडे (वय-६९) महापे येथे राहणारे नारायण डाऊरकर यांच्या कार्यालयात जमिनीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. यावेळी डाऊरकर यांनी खानझोडे यांना ७५ हजार रुपयांची रोख रक्कम दिली होती. त्यामुळे मिळालेली रक्कम घेऊन खानझोडे घरी परतत असताना हस्ती इंडस्ट्रीयल कंपनीजवळ स्कुटीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना अडवले होते. यावेळी खानझोडे यांनी मास्क लावला नसल्याने दंड भरावा लागेल, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले होते. त्यामुळे घाबरलेल्या खानझोडे यांनी त्यावेळी तक्रार दिली नव्हती. मात्र, दोन दिवसांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.