तळोज्यातील पदपथांवर धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातील पदपथांवर धोका
तळोज्यातील पदपथांवर धोका

तळोज्यातील पदपथांवर धोका

sakal_logo
By

खारघर, ता. २ (बातमीदार) : तळोजा वसाहतीमधील रस्त्यांलगतच्या पदपथांवरील झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उघड्या गटारांवर झाकणे तातडीने बसवावीत, अशी मागणी तळोजामधील रहिवाशांकडून होत आहे.
तळोजा वसाहती फेज एक आणि दोन परिसरात सिडकोने रस्त्याच्या कडेला पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे बांधण्यात आली आहेत; मात्र बहुतांश गटारावरील झाकणे गायब झाली आहेत; तर काही ठिकाणी झाकणे मोडकळीस आल्याने गटारात पडली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची तसेच महिला, ज्येष्ठ नागरिकांचा वावर असल्याने अपघाताचा धोका आहे. अशातच तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतर करण्यात आली असल्याने पालिकेने गटारावरील झाकण तसेच गटारांची साफसफाई करून घेणे आवश्यक होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील पदपथांची अवस्था दयनीय झाली आहे.
----------------------------------
खारघरमध्ये फायबरची झाकणे
खारघर परिसरात उघड्या गटारांवर सिडकोने दोन वर्षांपूर्वी फायबरची झाकणे बसवली होती; मात्र झाकणे कमकुवत असल्यामुळे सर्व झाकणे गायब झाली आहेत. आजही खारघर परिसरातील अनेक सेक्टरमधील झाकणे गायब झाली आहेत. सेक्टर चार बेलपाडा येथील अणुविज्ञान, सेक्टर २० पोलिस रुग्णालयासमोर फेरीवाल्यांची वर्दळ असलेल्या पदपथावरील झाकणे गायब झाली आहेत.
------------------------------------
सेक्टर नऊ शिवकॉर्नरलगत असलेल्या पदपथांवर अनेक दिवसांपासून झाकणे नाही. विशेष म्हणजे, सोसायटीलगत असलेल्या मोकळ्या जागेत जवळच असलेल्या शाळेतील मुले खेळत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
- आकाश ओहरी, रहिवासी, तळोजा
-----------------------------------
तळोजा वसाहत सिडकोकडे असताना दरवर्षी निविदा काढून गटारावरील झाकणाचे काम करण्यात येत होते; मात्र सध्या पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
- प्रल्हाद केणी, पदाधिकारी, भाजप
--------------------------------------
खारघरमधील गटारावरील झाकणे बसवली जात आहेत. तळोजा परिसरातील उघड्या गटारांची पाहणी लवकरच केली जाणार आहे.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी