२२००विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२००विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
२२००विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

२२००विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर)ः बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पनवेल शिक्षण विभागाकडून ११० शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून २२०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्याक समाजातील घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोर-गरीब, तसेच मध्यमवर्गीयांच्या मुलांना सधन व्यक्तींच्या मुलांप्रमाणे मोठ्या इंग्रजी शाळांत शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणातील विषमता दूर व्हावी, यासाठी केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार ( राईट टू एज्युकेशन) हा कायदा अमलात आणला आहे. यामुळे देशभरातील सुविधांनी परिपूर्ण अशा शाळांमध्ये दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण मार्च महिना सुरू झाला तरी अजूनही आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याने पालकांकडून स्थानिक शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पनवेल शहरातील ११० शाळांमध्ये २२०० विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून पालकांना आवाहन देखील करण्यात आले असून पालकांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतरच पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
----------------------------------------------------------
प्रवेशासाठी वाढीव वेळ मिळणार
शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही. ऑनलाईन भरलेली माहिती चुकीची असणार नाही, याची पालकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो. प्रवेश प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असून लॉटरी पद्धतीने होणार आहे. पालकांनी कुठल्याही प्रकारे प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच प्रवेशानंतर काही दिवसांनी संबंधित मुलाला आधार कार्ड शाळेत जमा करावेच लागणार आहे. आधार कार्ड दिले नाही तर काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊन प्रतीक्षेतील मुलास तेथे संधी दिली जाणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया लांबली असली तरीदेखील वाढीव वेळ दिला जाणार आहे.
----------------------------------------------
दलालांकडून पालकांना प्रलोभने
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच पनवेलमध्ये हमखास प्रवेश मिळवून देतो म्हणून पालकांकडून पैसे उकळण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पालकांचा समूह एकत्र करून एका विद्यार्थ्याचे ५० हजार दर ठरवला असून आगाऊ १५ हजार घेतले जात आहेत. समूहापैकी लॅाटरीमधून दोन-तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोच. प्रवेश न भेटल्यास पैसे परत दिले जातील, या बोलीवर हा व्यवहार पनवेलमध्ये सुरू आहे.
--------------------------------------------
अनात बालकांचा समावेश
आरटीई अंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाला यंदापासून कोरोनाबाधित बालकांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. ज्या बालकाच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांना या योजनेंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्याची सूचना शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरावरील सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे. यासह अनाथ बालकांनाही या नियमांतर्गत प्रवेश देण्यात येणार आहे.
---------------------------------------
प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळ
सुरुवातीला https://student.maharashtra.gov.in/ adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाइटवर
जाऊन अर्ज करा. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करा, पुन्हा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्डने लॉगिन करा. विद्यार्थ्याची मूळ माहिती भरून अर्जातील सर्व माहिती भरा. अर्जातील माहिती भरून झाल्यावर शाळेची निवड करा. शेवटी अर्जातील संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
-------------------------------------------
आवश्यक कागदपत्रे
रहिवासी पुरावा रेशन कार्ड, आधार कार्ड, वीजबिल, राष्ट्रीयीकृत बँक पासबुक, वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न) व जन्माचा दाखला.
---------------------------------------
मोफत आरटीई प्रवेश प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पडते. कोणत्याही व्यक्तीच्या प्रलोभनांना पालकांनी बळी पडू नये. ऑनलाईन पद्धतीने पार पडणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध केली जाते. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.
- सीताराम मोहिते, गटशिक्षण अधिकारी, पनवेल