जोगेश्‍वरीत ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ स्नेह मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्‍वरीत ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ स्नेह मेळावा
जोगेश्‍वरीत ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ स्नेह मेळावा

जोगेश्‍वरीत ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ स्नेह मेळावा

sakal_logo
By

जोगेश्‍वरी, ता. १ (बातमीदार) ः बाल विकास विद्या मंदिर माध्यमिक विभागाचे माजी क्रीडा प्रशिक्षक प्रल्हाद जाधव यांच्या संकल्पनेतून माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा अनौपचारिक स्नेह मेळावा पार पडला. माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेवक अनंत नर आणि समाजसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
माजी विद्यार्थिनी कविता खाडिलकर आणि माधवी घाग यांच्या गुरुवंदना व भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वांना पुन्हा एकदा भेटण्याची, हितगुज करण्याची संधी मिळाल्याने आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी त्यांच्या आयुष्यातील बहुमोल अशा ३५ वर्षांच्या कालावधीत विद्यार्थीरूपी हिऱ्‍‌यांना पैलू पाडण्याचे कार्य केले. त्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभिवादन स्वीकारताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. याप्रसंगी प्रल्हाद जाधव अतिशय जिव्हाळ्याने कला शिक्षिका अनघा घुगरे यांनी सुशोभित केलेली भेटवस्तू आठवण स्वरूपात सर्वांना दिली. माजी मुख्याध्यापिका डॉ. अपेक्षा खामकर, नीला वर्तक तसेच शिक्षिका नीलम साटम, सुधा दामले यांच्या कौतुकाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. माजी न म्हणता ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ अशा बोधवाक्याने सर्वांनी एकमेकांची मने जिंकली. माजी विद्यार्थी नीलेश परब यांनी उत्स्फूर्तपणे व्यवस्थापकाची भूमिका निभावली. असेच भेटत राहू, अशी एकमेकांना ग्वाही देत जड पावलाने स्नेहपूर्ण निरोप घेत कार्यक्रमाची सांगता करण्‍यात आली.