
सुवर्णमहोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता
किन्हवली, ता. १ (बातमीदार) : शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत निधी गोळा करून शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट देऊन शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शहापूर तालुक्यातील नडगाव येथील किसान हायस्कूलच्या स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण झाली. विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा व्हावा म्हणून या शाळेत १९७२ ते २०२० च्या दरम्यान शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनीता सोनू दिनकर यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी मंचाची स्थापना केली. माजी विद्यार्थी मंचाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
माजी विद्यार्थी रेखा पाटील, नंदकुमार पानसरे, मिलिंद दांडकर, दिलीप भोईर, लहू शेलवले, वंदना भालके, रोहिणी ठोंबरे, रोहिणी पवार, सुनीता पवार, हरिश्चंद्र भोईर या सर्वांनी व ग्रामस्थांकडून गोळा केलेल्या मदतनिधीतून नडगाव येथील किसान हायस्कूलमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवले. या वेळी शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवंत देशमुख, सचिव विद्या वेखंडे, मुख्याध्यापक कुमार उबाळे आदी उपस्थित होते.
किन्हवली : नडगाव हायस्कूलमध्ये बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन करताना मान्यवर व माजी विद्यार्थी.