
जव्हारमध्ये आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
जव्हार, ता. २ (बातमीदार) : पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या मार्गदर्शनाखाली अजंता ॲग्रो मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व श्री गुरू दत्तात्रय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने जव्हारमध्ये आदिवासी नागरिकांसाठी नुकतेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन गणेशनगर येथील यशवंत देशमुख हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी खासदार गावित यांनी सोसायटीमार्फत सभासद नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांना विकासाच्या दृष्टीने असणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील गोरगरीब व्यक्ती कोणत्याही आजाराने पीडित असेल तर त्यास मोफत उपचार व सेवा पुरवल्या जातील. दुर्धर आजाराने कुणी बाधित असेल तर रुग्णालयामार्फत सेवा दिली जाईल, असे सांगितले. या शिबिराला उपस्थित हजारो नागरिकांनी लाभ घेतला. यात मुख्यतः यकृत, मूत्रपिंड आणि रक्त आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करण्यात आली. तसेच प्रोटीन पॅकेट, मल्टी व्हिटॅमिन मेडिसिन, फंगल क्रिम, डायबेटीक ड्रग्स, कॅल्शियम आदी औषधे मोफत देण्यात आली. या उपक्रमात श्री गुरु दत्तात्रय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या पथकाने सहकार्य केले. शिबिरात रुग्णांची तपासणी करून ज्यांना दुर्धर आजार आहेत अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि इतर उपचार रुग्णालयात दाखल करून कमी पैशांत केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला अजंता ॲग्रो मल्टी स्टेट ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष अजित घोसाळकर, विभागीय अध्यक्ष यशवंत देशमुख आणि इतर सदस्य उपस्थित होते.