
पालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा
विरार, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ अंतर्गत अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. यामध्ये प्रभाग समिती ‘सी’ अंतर्गत जीवदानी पाडा येथे दोन अनधिकृत खोल्यांचे ४०० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत बिलालपाडा, पेल्हार येथे सात गाळे व १४ खोल्यांचे अनुक्रमे २६२५ चौरस फूट व २८०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाई वेळी उपायुक्त अजित मुठे, प्रभारी सहायक आयुक्त गणेश पाटील, प्रभारी सहायक आयुक्त शशिकांत पाटील, कनिष्ठ अभियंता कुणाल पाटील, एमएसएफचे कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रभाग समिती ‘जी’ वालीवअंतर्गत जूचंद्र सर्वे नं. ३८, ३९ मधील बापाणे रेल्वे ब्रिजजवळ २५००० चौरस फुटाच्या प्लिंथचे अनधिकृत बांधकाम व सर्वे नं. ३४ येथील कोल्ही खुताडी पाडा येथे १८०० चौरस फुटाच्या दोन अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाई वेळी प्रभारी सहायक आयुक्त दयानंद मानकर, कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव व गौरव परिहार, लिपिक सुनील तेलगोटे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनधिकृत बांधकाम मोहिमेत ३३ हजार चौरस फुटांपर्यंतचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.