
‘मौलिक वारसा जतनाचा’ कार्यक्रम कार्लेगडावर उत्साहात
कळवा, ता. १ (बातमीदार) : आगरी सेना आयोजित स्वच्छता अभियान आणि ‘मौलिक वारसा जतन, जनजागृती’ हा कार्यक्रम एकवीरा देवीच्या कार्लेगडावर पार पडला. आगरी सेनेचे मुंबई अध्यक्ष जयेंद्र खुणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. गडाच्या पायथ्यापासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. सर्व परिसर स्वच्छ केल्यावर एकवीरा देवीच्या प्रांगणात गडाचा इतिहास प्रसिद्ध चित्रकार मोरेश्वर पाटील यांनी जागा केला. या कार्यक्रमात एकवीरा भाविक मंडळ, अखिल भारतीय कोळी समाज, धर्माभिमानी आगरी कोळी संस्था, जय आगरी समाज सेवा संस्था, एकवीरा प्रतिष्ठान आदी संस्था, संघटना सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी कळवा येथील आगरी सेनेचे नेते प्रदी साळवी, चंद्रकांत ठाणकर, मनीषा पाटील, मनोज साळवी, कैलास पाटील, जयेश पाटील, अखिल भारतीय कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष परेश कांती कोळी, जितेंद्रशेठ फडके, आगरी कोळी धर्माभिमानी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, साहित्यिक सर्वेश तरे, कवी मोरेश्वर पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते.