महापालिकेची पीपीपी तत्वावरील प्रयोगशाळा

महापालिकेची पीपीपी तत्वावरील प्रयोगशाळा

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्या मिरा-भाईंदरच्या नागरिकांना आता सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. महापालिकेच्या मिरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात पॅथॉलॉजी, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रेडीओलॉजी, एमआरआय, एक्स-रे आदी चाचण्या शासकीय दरापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एका खासगी संस्थेच्या सहकार्याने पीपीपी तत्त्वावर ही सुविधा महापालिका लवकरच सुरू करणार आहे. कल्याण-डोंबिवली व पनवेल महापालिकेनंतर मिरा-भाईंदर महापालिकेकडून अशी प्रयोगशाळा सुरू होत आहे.
कोणत्याही आजाराचे निदान करायचे असेल तर डॉक्टर, रक्त, लघवी तपासणी, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी आदी चाचण्या करण्याचा सल्ला देतात. या चाचण्यांसाठी खासगी चाचणी केंद्रावर मोठा खर्च येत असतो, पण सामान्य रुग्णांना हा खर्च परवडत नाही. आतापर्यंत मिरा-भाईंदरमध्ये या चाचण्या सरकारी दवाखाना अथवा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी चाचणी केंद्रावरच या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. नागरिकांना यातून दिलासा देण्यासाठी महापालिकेने मिरा रोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. खासगी सार्वजनिक सहभागातून (पीपीपी) ही प्रयोगशाळा चालवण्यात येणार आहे. पुण्याच्या कृष्णा डायग्नोस्टिक्स या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले आहे. ही संस्था या सर्व वैद्यकीय चाचण्यांना सरकारी रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्‍या दरापेक्षा दोन टक्के कमी दराने शुल्क आकारणार आहे; तर हे दर खासगी चाचणी केंद्रांपेक्षा निम्म्याहून कमी असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या पैशांची बचत
महापालिकेने अत्याधुनिक प्रयोगशाळा स्वत: उभारली असती तर त्यासाठी महापालिकेला किमान दहा कोटी रुपयांचा खर्च आला असता. शिवाय प्रयोगशाळेसाठी लागणारे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांचा वेगळा खर्च आला असता. मात्र पीपीपी तत्त्वावर प्रयोगशाळा सुरू होणार असल्यामुळे महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही. महापालिकेकडून केवळ रुग्णालयातील जागा या संस्थेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रयोगशाळा चालवणारी कृष्णा डायग्नोस्टिक्स आवश्यक असलेले मनुष्यबळ, अत्याधुनिक उपकरणे, तसेच देखभाल-दुरुस्ती हा सर्व खर्च करणार आहे. प्रयोगशाळेत सर्व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असणार आहेत. सध्या दहा वर्षांसाठी या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर सेवा पाहून ते पुढे वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी चोवीस तास खुली असली तरी त्यात मिरा-भाईंदरच्या रहिवाशांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

एमआरआयसाठी २२०० ते २५०० रुपये खर्च
प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे दर शासकीय दरांपेक्षा कमी आहेत, पण प्रत्येक वेळी शासकीय दरात होणाऱ्‍या बदलानुसार हे दर संस्थेला वाढवून देण्यात येणार आहेत. सध्या एमआरआय या चाचणीसाठी खासगी केंद्रावर किमान साडेपाच हजार रुपये घेतले जातात, महापालिकेच्या प्रयोगशाळेत त्यासाठी सुमारे २२०० ते २५०० रुपये खर्च येणार आहे. सीटी स्कॅनसाठी ११०० रुपये घेण्यात येणार आहेत, तर पॅथॉलॉजी चाचण्यांसाठी सत्तर रुपये, डिजिटल एक्स-रे ८० रुपये आकारण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com