
दहावीचे ३५ हजार परीक्षार्थी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा गुरुवार (ता.२) पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ७४ केंद्रावर ३५ हजार ७३३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासनाने कॉपी मुक्त महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी व्यापक स्वरूपात केली आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात खास पथक नेमण्यात आले असून पथकाने गैरप्रकार होणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गुरुवारपासून सुरू होणारी परीक्षा २५ मार्चपर्यंत पूर्ण होईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे परीक्षेत कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. या पथकात कमीत कमी चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील, दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाकडून त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणतील, तसेच आवश्यक त्या सूचना पोलिसांना देऊन गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून दीड महिन्यापासून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. तसेच परीक्षा केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
जिल्हा दक्षता समिती सक्रिय
परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीकडे देण्यात आली आहे. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, शिक्षण विभागाने परीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठित करण्यात आली आहे.
१०० मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर बंद
झेरॉक्स सेंटरवर प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स कॉपी करून मुलांना पुरवली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. यंदा परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भातील सूचना जिल्हा दक्षता समितीने झेरॉक्स सेंटर चालकांना दिली आहेत. झेरॉक्स सेंटर उघडे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, यासाठी तालुका स्तरावरील एक आणि जिल्हा स्तरावर पाच भरारी पथक नेमण्यात आली आहेत. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची झाडा झडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही फिरकू दिले जाणार नाही. निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर जसा बंदोबस्त असतो, त्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर पोलिसांची नजर राहणार आहे.
परीक्षा केंद्रावर व्हीडिओ रेकॉर्डिंग असणार आहे. तोतया विद्यार्थी सापडल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, हा उद्देश समोर ठेवून पारदर्शक स्वरूपात परीक्षा पार पाडावी यासाठी अभियान सुरू केले आहे. परीक्षा केंद्रावर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी नोडल व झोनल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
- डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी- रायगड
जिल्हास्तरीय भरारी पथकासह बैठे पथक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी असेल. कॉपीसारखे गैरप्रकार टाळताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील वातावरण भयमुक्त वाटावे, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भातील सूचना केंद्रप्रमुखांना पाठवण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागणार आहे.
- ज्योत्स्ना शिंदे-पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी