हप्ता वसुलीच्या वादातून शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हप्ता वसुलीच्या वादातून शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या
हप्ता वसुलीच्या वादातून शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या

हप्ता वसुलीच्या वादातून शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : ठाण्याच्या मुख्य बाजारपेठ, स्टेशन परिसरात कधीही न हटणारे फेरीवाला रॅकेट आणि फेरीवाला हप्ता वसुलीचा उद्रेक मंगळवारी चव्हाट्यावर आला. फेरीवाल्याच्या वर्चस्वाच्या कारणावरून शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपविभागप्रमुख रवींद्र परदेशी (वय ४८) यांची हत्या करण्यात आली.

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून ठाणे नगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये ध्रुव पटवा आणि अशरफ हजरत अली यांचा समावेश आहे. ठाण्याच्या जांभळी नाका, पेढा मारुती मंदिरासमोर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चॉपरच्या साह्याने शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवींद्र परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत रवींद्र परदेशी याला ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रवींद्रला मृत घोषित केले. या प्रकरणात रवींद्र परदेशी हा राजेंद्र परदेशी ऊर्फ बारक्या याचा लहान भाऊ आहे. फेरीवाल्यांवर राजेंद्रचे वर्चस्व होते. त्याच्या मृत्यूनंतर रवींद्र हादेखील फेरीवाल्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत होता. त्यातच नुकतीच त्याची शिवसेना (शिंदे गट) मध्ये उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, फेरीवाल्यांच्या हप्तावसुली आणि वर्चस्वाच्या स्पर्धेचा रवींद्र परदेशी हा बळी ठरला. त्याची हत्या करणारे हेदेखील फेरीवाले असल्याची माहिती उपलब्ध आहे.

हप्तेवसुलीच्या वर्चस्वातून हत्या
मृतक रवींद्र परदेशी याचा मोठा भाऊ राजेंद्र परदेशी हा फेरीवाल्यांकडून हप्तेवसुलीचे रॅकेट चालवत होता. त्याच्या मृत्यूनंतर हे रॅकेट हे रवींद्र परदेशी चालवण्याचा प्रयत्न करीत होता. या वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली. हत्येनंतर दोघा आरोपींनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले, परंतु सीसी टीव्हीत हत्येच्या थरारात दिसणारा तिसरा संशयित कोण, याचा शोध ठाणेनगर पोलिस घेत आहेत. हप्तावसुलीने त्रस्त झालेल्या फेरीवाला आणि वसुलीखोर यांचा उद्रेक झाल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.