ठाण्यात ९६ बालकांना छत्रछाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात ९६ बालकांना छत्रछाया
ठाण्यात ९६ बालकांना छत्रछाया

ठाण्यात ९६ बालकांना छत्रछाया

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे. या महामारीच्या काळात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक, माणसे गमावली आहेत. तसेच आई आणि वडील अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेक बालकांच्या डोक्यावरील मायेचा हात हरपला आहे. अशा बालकांना मायेचा आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सरसावले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ९६ बालकांना १५ लाखांची मदत मिळाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते अडीच वर्षे कोरोनाने थैमान घातले होते. त्यात कोरोनाच्या सुरुवातीला अत्यल्प प्रमाणात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने बाधितांच्या संख्येत व या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. सुरुवातीच्या काळात कोरोनावरील उपचार पद्धती अवगत नसल्याने रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा फटका सर्वाधिक बसला. या काळात कोरोना आजारामुळे अनेक मुले अनाथ झाली. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारत केंद्र आणि राज्य सरकारने अशा बालकांना आर्थिक मदत जाहीर केली. जे अर्ज ऑनलाईन आले आणि ते परिपूर्ण होते अशा अर्जांची निवड करण्यात आली होती. काहींना कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या; मात्र टास्क फोर्सच्या माध्यमातून त्या-त्या विभागाशी संपर्क साधून कागदपत्रे गोळा करून या बालकांना मदत दिली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

-------------------
१४१२ बालके बालसंगोपन योजनेत
महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अर्थात पीएम केअर्स योजना केंद्राची आणि सीएम केअर्स योजना राज्यासाठी राबवली जात आहे. या योजनेतून बालकांना लाभ मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर ठाणे जिल्ह्यातील ९६ बालकांना ५ आणि १० लाखांची आर्थिक मदत त्यांच्या खात्यात देण्यात आली आहे. केंद्राकडून १० लाख आणि राज्याकडून ५ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारची १० लाखांची मदत ५० बालकांना, तर राज्य सरकारची ५ लाखांची मदत ४६ बालकांना मिळाली आहे; तर १४१२ जणांना बालसंगोपन योजनेत सामावून घेतले. गेले अनेक महिने रखडलेली ही रक्कम अखेर बालकांच्या खात्यात जमा झाली आहे.

……………………
ठाण्यातील बालकांना मिळालेला लाभ
पीएम केअर
५० बालके
………………
सीएम केअर
४६ बालके