स्वच्छ नवी मुंबईसाठी आयुक्त रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ नवी मुंबईसाठी आयुक्त रस्त्यावर
स्वच्छ नवी मुंबईसाठी आयुक्त रस्त्यावर

स्वच्छ नवी मुंबईसाठी आयुक्त रस्त्यावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १ः स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यंदा देशात पहिला क्रमांक पटकावण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्याचे नवी मुंबई महापालिकेने निश्चित केले असून त्यादृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे. याच अनुषंगाने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकाळी ६.३० वाजल्यापासून नेरूळ, तुर्भे व वाशी विभागाचा, तसेच तुर्भे विभागातील एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने शहरातील स्वच्छतेचा आढावा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे नेरूळ, तुर्भे व वाशी विभागाचा तसेच तुर्भे विभागातील एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्य रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या मालकांना कल्पना देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच जी वाहने बऱ्याच दिवसांपासून धूळ खात रस्त्याच्या कडेला उभी आहेत, त्यांना नोटीस लावून ती उचलण्याचे आदेश दिले. तसेच ज्याठिकाणी रस्ते, पदपथ, गटारे यांची कामे सुरू आहेत व त्याच्या खोदकामाचे ढिगारे अस्ताव्यस्त पडून आहेत, त्या ठिकाणचे डेब्रिजला ग्रीन नेट लावण्याचे आदेशही त्यांनी दिले. अशाच प्रकारे तुर्भे नाका येथील फायझर रोडवर असलेल्या सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना त्या परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्याठिकाणी सध्या तांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने बंद असलेले ई-टॉयलेट्स तांत्रिक रचना काढून सर्वसाधारण पद्धतीने सुरू राहतील, याच्या तातडीने अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांमार्फत सूचना देण्यात आल्या.
---------------------------------------
बेकायदा होर्डिंगवर कारवाईचे आदेश
शहर सुशोभीकरणासाठी शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या आकर्षक शिल्पाकृतींच्या सभोवताली बसवण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हे होर्डिंग तातडीने काढून टाकण्याचे निर्देशही दिले.