
मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांना ११ महिन्यात १०० कोटींचा दंड
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गेल्या अकरा महिन्यात १८.०८ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १०० कोटी यांचा दंड वसूल केला आहे. अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करणारा मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतील पहिला विभाग ठरला. मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल गाड्या, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली होती. तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत १८.०८ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण १००.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०.०३ लाख प्रवाशांकडून ६१.६२ कोटींचा दंड आकारला होता. त्यामुळे वर्षभराच्या कारवाईची तुलना केल्यास महसुलात ६२.७९ टक्क्यांची, तर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवरील कारवाईत ५०.३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एसी लोकलमधील २५ हजार ७८१ प्रवाशांकडून ८७. ४३ लाख, तर प्रथम श्रेणी डब्यांमधील १.४५ लाख प्रवाशांकडून ५.०५ कोटींचा दंड आकारण्यात आला.