पालकांनो, शिक्षकांच्या पाठिशी उभे रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो, शिक्षकांच्या पाठिशी उभे रहा
पालकांनो, शिक्षकांच्या पाठिशी उभे रहा

पालकांनो, शिक्षकांच्या पाठिशी उभे रहा

sakal_logo
By

किन्हवली, ता. २ (बातमीदार) : चंगळवादाकडे निघालेल्या नव्या पिढीमध्ये संस्कार, शिस्त आणि विधायक वृत्ती रुजवायची असेल तर पालकांनी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. पालकच जर चुकणाऱ्या पाल्याला पाठीशी घालून शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू लागले तर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. किन्हवलीत आयोजित सत्कार सोहळ्यात पालकांशी हितगुज साधताना ते बोलत होते.
किन्हवलीतील पार्वती-शंकर शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यामंदिर व पी. एस. धानके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शहापूर तालुका शिक्षक सेना व मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार म्हात्रे यांनी उपस्थित शेकडो पालकांशी हितगुज साधत मार्गदर्शन केले. या वेळी आमदारांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे दत्तात्रय किरपण यांनी, तर सूत्रसंचालन संतोष दवणे यांनी केले. यावेळी हजारो विद्यार्थी-पालकांसह आदर्शचे संस्थापक-अध्यक्ष विष्णू धानके, मुख्याध्यापिका सुजाता धानके आदींसह मान्यवर उपस्थित होते. बालकलावंतांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद देत रोख बक्षिसांची उधळण केली.

--------------------------
उज्ज्वल भविष्याला आपणच जबाबदार
चोरी करूनही पाठीशी घालणाऱ्या पालकांमुळे एक सामान्य विद्यार्थी अट्टल चोर बनून फाशीच्या तख्तावर जाऊन पोहोचतो, ही गोष्ट पालकांना ऐकवली. मुलांचे लाड जरूर करा; पण त्यांच्या चुकांची भलावण करून शिक्षकांशी भांडू नका. सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी शिक्षकांना तुमच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे, अन्यथा आपणच आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू हे विसरू नका, असेही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांच्या आवाहनाला उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.