राजकीय शक्तीप्रदर्शनाची चढाओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय शक्तीप्रदर्शनाची चढाओढ
राजकीय शक्तीप्रदर्शनाची चढाओढ

राजकीय शक्तीप्रदर्शनाची चढाओढ

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबईत ठाकरे गटाच्या शिवगर्जना मोहिमेला सुरुवात झाली आहे. यापूर्वीही शिवसेनेने अनेक संकटे झेलली असल्याने लढाई आपल्याला नवीन नाही. आता परिस्थिती आणीबाणीची असल्याने लढण्यासाठी वेगळीच मजा आहे. त्यामुळे आता कोंढाणा सर केलेले नरवीर तानाजी मालुसरे आणि घोडखिंडीत शत्रूला रोखून धरणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे जिंकेपर्यंत लढायचे. गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार नेरूळ येथे झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला. या मेळाव्याला शिवसेना नेते भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि खासदार राजन विचारे उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नेरूळ येथील सेक्टर ९ मधील अहिल्याबाई होळकर सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. शिवसेना एकरूप झाल्यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या मेळाव्यांना रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि मातोश्री कुणाची हे देशातील लहान मुलांना विचारले तरी त्याचे एकच उत्तर असेल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! हे वास्तव असताना निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण देऊन टाकला. पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा पहिला निकाल लागला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र रडला, मात्र दुसऱ्या निकालानंतर महाराष्ट्र सावरला आहे. त्यामुळे आता गद्दार आणि त्यांच्या पाठीराख्यांची पळता भुई थोडी होणार आहे, असा विश्वास यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
--------------------------------------
जिंकण्यासाठी लढण्याचा कानमंत्र
जनता आपल्याला कार्यकर्ते नाही तर सैनिक म्हणून ओळखते. सैनिक जेव्हा लढाईला निघतात, तेव्हा त्यांना विचारले जाते एनी प्रॉब्लेम, सैनिकांचे उत्तर असते ‘नो प्रॉब्लेम!’ शिवसैनिकांनाही त्यांच्या डिक्शनरीतून ‘नो प्रॉब्लेम’ हा शब्द आता काढून टाकायचा आहे. आपल्याला जिंकण्यासाठी लढायचे आहे. आपल्यातून आता ४० गद्दार जरी गेले असले तरी त्यांच्या जागेवर आपल्याला १४० निष्ठावंत निवडून आणायचे आहेत. त्यामुळे आजपासूनच गद्दारांना हटवून महाराष्ट्र आणि देशाला वाचवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.
----------------------------------
फक्त कॉन्ट्रॅक्टर गेले
सत्तेसाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे फक्त कॉन्ट्रॅक्टर गेले आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे गंभीरपणे उभे आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या मेळाव्यांना मोठी गर्दी होत आहे. गद्दारांना मात्र भाडोत्री गर्दी जमा करावी लागत आहे, असा घणाघात यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी केला आहे.