
अरुंद रस्त्याने तळोजावासी त्रस्त
खारघर, ता. २ (बातमीदार) : तळोजा वसाहतीमधून भुयारी मार्गाने खारघरकडे जाताना मेट्रो पुलाखाली रस्त्याच्या कडेला असलेली मोठी दगडे आहेत. त्यात अरुंद रस्त्यामुळे सिग्नल ओलांडताना किरकोळ अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. अपघात टाळण्यासाठी पालिका आणि सिडकोने अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी तळोजावासीयांकडून केली जात आहे.
पनवेल-दिवा रेल्वे मार्गावरील तळोजा फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिडको आणि रेल्वेने भुयारी मार्ग उभारले आहे. तळोजा वसाहतीतून बाहेर पडताना शीघ्र कृती दल चौकासमोर खारघर, पनवेल, शिळफाटा आणि तळोजा वसाहत असे चार मार्ग आहेत. या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, तेथील मेट्रो पुलाखालील रस्त्याच्या कडेला मोठमोठी दगडे असून रस्ताही अरुंद आहे. परिणामी, सिग्नल यंत्रणा सुरू होताच वाहनचालकांना कसरत करावी लागते. अरुंद रस्ता, दगड आणि खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे. रस्त्यालगत असलेले दगड काढून रुंदीकरण केल्यास सिग्नललगत होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. वाहनचालकांना विनाअडथळा सिग्नल यंत्रणा लवकर पार करता येईल. पालिका आणि सिडको प्रशासनाने पाहणी करून रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी तळोजावासीयांकडून केली जात आहे. दरम्यान, सिडकोने तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतरण केल्यामुळे हे काम पालिकेने करावे, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेने लक्ष देण्याची गरज
सिग्नल यंत्रणेवर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांकडे विचारणा केली असता, तळोजा वसाहतीमधून बाहेर पडताना सिग्नललगत रस्ता अरुंद आहे. गटारावरील पूल काढून रस्त्याचे विस्तार केल्यास वाहतूक कोंडी दूर होईल आणि अपघात होणार नाही. त्यामुळे पालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
वसाहतमधून बाहेर पडताना पुलाची झालेली दुरवस्था, अरुंद रस्ता आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांमध्ये होणाऱ्या चढाओढीमुळे आठ दिवसांत दोन दुचाकीचालक पडून जखमी झाले आहेत. हा रस्ता मोठा केल्यास वाहनचालकांना पुरेशी जागा मिळेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही. पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
- एन. हाजी, नागरिक, तळोजा
शीघ्र कृती दलासमोरील सिग्नल यंत्रणेलगत होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती उपाययोजना केली जाईल.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर