सोशिक डोंबिवलीकर, सुस्त प्रशासन

सोशिक डोंबिवलीकर, सुस्त प्रशासन

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : कल्याण-डोंबिवलीत प्रशासकीय राजवट लागू असून नागरी सुविधांची वाणवा आहे. रस्त्यांची सुरू असलेली कामे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास, कचऱ्याची समस्या, रिक्षांची समस्या यांसारख्या अनेक प्रश्नांना सर्वसामान्य नागरिक दररोज तोंड देत आहे. सोशल मीडियावर आवाज उठवणारा सामान्य नागरिक प्रत्यक्षात कृती करत नसल्याचे दिसून येते. झोपेचे सोंग घेतलेल्या नागरिकांना जागे करण्यासाठी विद्या निकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शाळेच्या बसवर एक फलक लावला आहे. ‘सोशिक डोंबिवलीकर व्हॉट्स अॅपचा आशिक, रस्त्यावर उतरणार नाही’ असे म्हणत पंडित यांनी जनतेचे कान पिळले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट येथे लागू झाली आहे. शहरात नागरी असुविधा असूनही कोणीही त्याच्याविरोधात आवाज उठवत नाही. नगरसेवक माजी झालेले आहेत. त्यामुळे प्रशासन त्यांना जुमानत नाही. कोणीतरी याविरोधात आवाज उठविला पाहिजे. शाळा म्हणजे फक्त मुलांना शिकवणे नाही. मुलांमधले दोष दुरुस्त करून त्यांना चांगली शिकवण शाळेत दिली जाते. तसेच समाजातही काही दोष असून तेही दूर केले पाहिजेत. झोपलेल्यांना उठवावे लागते, आपल्याकडे झोपेचे सोंग घेतलेले जास्त आहेत, असे पंडित यांनी सांगितले.

------------------
नागरी सुविधांबद्दल जाग येण्यासाठी प्रयत्न
डोंबिवलीत अतिसुशिक्षित, पण बहुतांशी उदास असणाऱ्या नागरिकांना, नागरी सुविधा योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात मिळत नाहीत. रस्ते सिमेंटचे करताना एव्हढे उंच करतात की आजूबाजूची घरे, पावसाळ्यात पाण्याने घेरली जातील. कचऱ्याचे ढीग दिसतात. केडीएमसीच्या डेव्हल्पमेंट योजनांत डोंबिवलीला काय स्थान आहे? सर्व जाणीव असूनही, नागरिक कधी प्रशासनाला धारेवर धरत नाहीत. बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी उपलब्ध नसतात. शाळांनी नुसते मुलांना नागरिकशास्त्र शिकवू नये; तर नागरी जीवनातील त्रुटींवर संबंधितांना जाब विचारला पाहिजे. नागरिकांना त्यांच्या या बाबतीतील जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. आपण लावलेल्या बॅनरमुळे लोकांना आणि प्रशासनाला आपले काय चुकते याचे भान येईल, हा यामागचा उद्देश असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com