
बसचालक मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचालकाला झालेल्या मारहाणप्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन बुधवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास मागे घेण्यात आले; मात्र कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांनी बससेवा ठप्प केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
मिरा रोड स्थानकातून विनयनगरकडे जाणाऱ्या बससमोर एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दुचाकी आणून बस थांबवण्यास भाग पाडले होते. बसचालक रामेश्वर बिडवे यांनी खाली उतरून पाहिले असता दुचाकीवरील व्यक्ती परिवहन सेवा चालवण्याचे कंत्राट घेतलेले हॅरल बोर्जीस यांचा मुलगा गॅवीन बोर्जीस असल्याचे समजले. या वेळी संतप्त झालेल्या गॅविनने चालकाच्या श्रीमुखात भडकावून दिली व चालकाला शिवीगाळ केली. याची माहिती चालकाने परिवहन कार्यालयात दिल्यानंतर परिवहन सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना बिडवे यांना देण्यात आल्या; मात्र या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने कर्मचाऱ्यांना बसगाड्या बंद करायला सांगितले. त्यामुळे शहरातील संपूर्ण परिवहन सेवा सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ठप्प झाली. बसचालक रामेश्वर बिडवे यांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात जाऊन गॅविन बोर्जीस याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
अतिरिक्त आयुक्तांची नाराजी
गॅविन बोर्जीस याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिवहन सेवेचे कंत्राट रद्द करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केली. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्याकडे गुरुवारी (ता. २) कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मारहाण प्रकरणात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा कंत्राट रद्द करण्याशी संबंध नाही, असे सांगून मानोरकर यांनी बसगाड्या बंद करून प्रवाशांना वेठीस धरल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.