
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत खून
कासा, ता. २ (बातमीदार) : तलासरी तालुक्यात एका ४५ वर्षीय प्रौढाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. तलासरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला अटक केली. घरगुती वादातून शेजारी राहणाऱ्या मुलीचा खून केल्याची त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तलासरी तालुक्यात रमेश दुबळा (वय ४५) हा मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादासोबत आर्थिक देवाणघेवाणीवरूनही त्याचे तिच्या कुटुंबीयांबरोबर वाद होते. त्याचा राग मनात धरून त्याने बुधवारी (ता. १) मुलीला फूस लाऊन मोटरसायकलवरून घेऊन गेला होता. तिच्या घरापासून सहा किलोमीटर दूर असणाऱ्या शाळेजवळ त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संजान भीलाड पाडा रोड येथील जंगलात गळा दाबून खून केला. रात्री दहा वाजता ती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी तलासरी पोलिस ठाण्यात दिली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या गंभीर बाबीची दखल घेत त्यांनी तलासरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रमेश याला ताब्यात घेतले आहे. घरगुती वादातून अपहरण करून तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी त्याच्यावर तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.