
बापुगावजवळ अवैध मद्यसाठी जप्त
कासा, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दमण तसेच सेल्वास बनावटीची अवैध दारू वाहतूक तसेच विक्री रोखण्याकरिता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी (ता. १) कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना दुपारी बाराच्या सुमारास बापुगाव येथील आश्रम शाळेच्या बाहेरील संजना किराणा दुकानामध्ये दमण तसेच सेल्वास बनावटीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. दुकानातून १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जानू लिलका (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे.
हवालदार हिरामण खोटरे व संदीप सरदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने तात्काळ वरिष्ठांना कळविले असता पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक भरतेश हारुगिरे, हवालदार दीपक राऊत, कैलास पाटील, कपिल नेमाडे, दिनेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. जानू लिलका यास कासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले असून पुढील तपास कासा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहेत.