नालेसफाईच्या कामाला पंधरवड्यात सुरुवात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाईच्या कामाला पंधरवड्यात सुरुवात!
नालेसफाईच्या कामाला पंधरवड्यात सुरुवात!

नालेसफाईच्या कामाला पंधरवड्यात सुरुवात!

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचा श्रीगणेशा यंदा महिनाभर आधीच होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध कामांसाठीच्या ३१ निविदांची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी २२ कामांना येत्या १५ मार्चपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. मान्सूनच्या कामाच्या पावसाळ्यापूर्वीच्या विविध कामांचे नियोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. नालेसफाईच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरांतील आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावरील छोटे-मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांसारखी कामे नालेसफाईअंतर्गत अपेक्षित आहेत. त्यासोबतच मिठी नदीचा गाळ काढण्याचे कामही कामाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्व कामांसाठी एकूण ३१ निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २२ कामांना पंधरवड्यात सुरुवात होणे अपेक्षित आहे.

मुंबईतील नालेसफाईच्या कामाला गेल्या वर्षी ७ एप्रिलला सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी ३१ मेपर्यंत ९१९७९८.७८ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. विरोधी पक्षाकडून नालेसफाईच्या कामाच्या निमित्ताने गेल्या वर्षीही टीका झाली होती. नालेसफाईत गाळ कमी काढण्यात आला असला तरीही मुंबई महापालिकेने पैसे मात्र वाढीव पद्धतीने दिल्याचा आरोप भाजपने केला होता.

मान्सूनपूर्व कालावधीत ७५ टक्के नालेसफाईचे उद्दिष्ट
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामासाठी १५० कोटींचा खर्च केला होता. त्यामध्ये शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरामध्ये १०० टक्क्यांहून अधिक काम झाल्याचा दावा पालिकेने गेल्या वर्षीही केला होता. त्यासोबतच मिठी नदीच्या क्षेत्रातील गाळ उपसण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व कालावधीत ७५ टक्के नालेसफाईचे काम करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.