घणसोलीतून १८ बांगलादेशी नागरिक अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतून १८ बांगलादेशी नागरिक अटकेत
घणसोलीतून १८ बांगलादेशी नागरिक अटकेत

घणसोलीतून १८ बांगलादेशी नागरिक अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबई परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या १८ बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी (ता. १) रात्री घणसोली गावात छापा मारून अटक केली. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. एका सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी हे सर्व जण इमारतीमध्ये एकत्र जमले असताना कारवाई करण्यात आली.

मूळचे बांगलादेशी असलेले सोहेब व सभुज शेख हे त्या देशातील नागरिकांना अवैध मार्गाने भारतात बोलावून त्यांच्या नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याचप्रमाणे सभुज याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री काही बांगलादेशी नागरिक घणसोली गावातील म्हात्रे आळीतील मोरया अपार्टमेंटमधील इमारतीच्या टेरेसवर पार्टी करण्यासाठी जमणार असल्याचे समजले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने मोरया अपार्टमेंटवर छापा मारला. या वेळी त्या इमारतीच्या टेरेसवर पार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे नसल्याने आठ पुरुष आणि १० महिलांना ताब्यात घेतले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या सर्वांविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात पासपोर्ट अधिनियम, तसेच विदेशी नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

नवी मुंबई, ठाणे परिसरात काम
पोलिसांच्या चौकशीत ते नवी मुंबई परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून ते वर्षभरापासून राहत असल्याचे उघड झाले. घणसोली, कोपरखैरणे, कळवा, शिळफाटा आदी भागांत वेगवेगळे काम करत होते. काही नागरिकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतले असल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.