ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

sakal_logo
By

पालघर, ता. २ (बातमीदार) : हवामान बदलामुळे येत्या काही दिवसांत पालघरमध्ये ढगाळ वातावरण असणार असून ४ ते ६ मार्च या कालावधीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचा परिणाम हरभरा, वाल व चवळी या पिकांवर होणार असल्याने शेतऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानुसार दक्षिण-मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकणावरही याचा परिणाम होणार आहे. ४ ते ६ मार्च पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात ४ ते ६ मार्चदरम्यान अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कोसबाड येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी अवस्थेत असलेल्या हरभरा, वाल व चवळी या रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत काढणी करून घ्यावी, कमाल तापमान जास्त असल्याने कडधान्य पिकाच्या शेंगा तडकू शकतात. त्यामुळे पिकांची काढणी सकाळच्या वेळेस करावी. त्याबरोबर परिपक्व झालेला भाजीपाला व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तापमानात वाढ होत असल्याने जनावरे व कोंबड्यांचे वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.