
महावितरणतर्फे उद्या ‘लाईनमन दिवस’
मुंबई, ता. २ : महावितरण यंत्रणेत सर्वांत शेवटचा आणि ग्राहकांशी जोडलेला घटक म्हणून ‘लाईनमन’ला यापुढे अधिक सन्मान मिळणार आहे. देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्याबाबत सर्व सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने येत्या ४ मार्च रोजी महावितरणतर्फे लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जनमित्र’ म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळित वीजपुरवठ्यासाठी २४ तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवस साजरा केला जाणार आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडल स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन प्रबोधन करण्यात येईल. या दिनाच्या निमित्ताने महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लाईनमन दिवस कार्यक्रमास सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.