
पत्नीच्या यकृतदानातून पतीला जीवदान
मुंबई, ता. २ : नाशिक येथील रहिवासी असलेल्या आणि लिव्हर सिरोसिसने त्रस्त असलेल्या पतीला यकृतदान करत पत्नीने जीवदान दिले. सदर रुग्णाचे वजन १५० किलो असून अनेक वर्षांपासून त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होता. दरम्यान, कोविड काळात वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता. अखेर पत्नीने यकृतदान करत पतीला जीवदान दिले.
जितेंद्र बेलगावकर हे नाशिकचे व्यापारी असून काही वर्षांपूर्वी त्यांना फॅटी लिव्हरचा आजार झाल्याचे निदान झाले होते. कोविड काळात वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना ओठातून रक्तस्राव आणि पायाला सूज आली होती. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांना फॅटी लिव्हरच्या आजारामुळे लिव्हर सिरोसिस झाला होता. ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. प्रत्यारोपणाच्या यादीत वर्षभर वाट पाहिल्यानंतरही दाता सापडत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पतीची ढासळलेली प्रकृती पाहून अखेर पत्नीने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना समुपदेशन करून आहार व औषधोपचार देण्यात आले. रुग्णाच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून शस्त्रक्रियेनंतर १८ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
---
रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यांचे यकृत नीट काम करत नव्हते. अधिक वजनामुळे यकृत प्रत्यारोपण करणे आव्हानात्मक होते. जास्त वजन असलेल्या रुग्णांमध्ये जिवंत दात्याचे प्रत्यारोपण करण्याची शिफारस केली जात नाही; पण प्रकृती ढासळल्याने तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या यकृत दानातून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
- गौरव चौबळ, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ.
----
पतीचे वजन अधिक होते. त्यांना फॅटी लिव्हरचा आजार असल्याचे निदान झाले, तेव्हा आम्ही खूप घाबरलो. काही दिवसांनी त्यांची तब्येत खूप खालावली. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. ब्रेनडेड दाता न मिळाल्याने मी माझे यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यामुळे माझ्या पतीला नवजीवन मिळाले.
- जयश्री बेलगावकर, पत्नी
---
लठ्ठपणा मोठी समस्या
लठ्ठपणा ही देशातील आरोग्य समस्यांपैकी मोठी समस्या आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक लठ्ठ रुग्णांमध्ये विविध आजार वाढत आहेत. संतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव असल्यास लिव्हर सिरोसिस होण्याचा धोका अधिक असतो, असे ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी सांगितले.