
तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पनवेल, ता. २ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकावर आईसह झोपलेल्या तीन वर्षीय मुलीला रेल्वे स्थानकाबाहेर उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर फरारी झालेल्या आरोपी मुकेशकुमार बाबू खाँ साह (वय ३०) याला लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे जुईनगर रेल्वे स्थानकातून काही तासांत अटक केली.
आरोपी रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करत असे आणि कळंबोली येथील ब्रिजखाली राहत होता. घटनेतील पीडित तीन वर्षीय मुलगी बुधवारी रात्री आपल्या आईसह पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील बाकड्याजवळ झोपली होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची आई शौचालयाला गेली होती. यादरम्यान आरोपीने तिला उचलून नेत अत्याचार केला. आईने परत आल्यानंतर मुलीचा शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने तिने पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला असता ती रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस असलेल्या सिमेंट स्लीपरजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तिला तात्काळ पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आनंदकुमार, पोलिस निरीक्षक सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक सबिर राणा, पोलिस निरीक्षक प्रकाश होवाळ व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.