
लोकलमध्ये प्रवाशाच्या मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण ते टिटवाळा रेल्वेस्थानकादरम्यान लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मालवाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
आंबिवली येथे राहणारे बबन हांडे-देशमुख (वय ६५) हे गुरुवारी (ता. २) दुपारी काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते कल्याण स्थानकातून टिटवाळा लोकलने घरी चालले होते. सामान्य डब्यात गर्दी असल्याने लोकलमधील मालवाहतूक डब्यात ते चढले होते. लोकलमध्ये चढत असताना त्यांचा एका प्रवाशाला धक्का लागला, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या प्रवाशाने त्यांना मालवाहतूक डब्यात बेदम मारहाण केली. लोकल धावती असल्याने डब्यातील इतर प्रवाशांना काय चालले, हे कळले नाही. बेदम मारहाण झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
टिटवाळा स्थानक येण्यापूर्वीच मारेकरी लोकलमधून उतरून पळून गेला. टिटवाळा स्थानकात मालवाहतूक डब्यात एक व्यक्ती मरण पावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुक्मिणीबाई रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.