नालासोपाऱ्यात ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालासोपाऱ्यात ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त
नालासोपाऱ्यात ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

नालासोपाऱ्यात ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगरमध्ये तुलिंज पोलिसांनी धडक कारवाई करत, एका नायजेरियन व्यक्तीकडून ५८ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. नालासोपारा परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई असून, अमली पदार्थांविरोधात भविष्यातही कारवाई सुरू राहील, असे मिरा-भाईंदर, वसई-विरार परिमंडळ ३ चे प्रभारी पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.

प्रगतीनगर परिसरात एका नायजेरियन नागरिकाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असून तो विक्री करत असल्याची माहिती तुलिंज गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचा प्रगतीनगर परिसरात सापळा रचण्यात आला असता संशयित नायजेरियन व्यक्तीने पोलिसांना पाहून पळ काढला. पण पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत १०२.४०० ग्रॅम वजनाचे १० लाख २४ हजार किमतीचे एमडी हा अमली पदार्थ सापडला. त्याच्या घराची झडती घेतली असता १७ लाख २२ हजार ५०० रुपयांचे १७१.२५० ग्रॅमचे कोकेन आणि ३१ लाख २८ हजार ३०० रुपयांचे २२३.४५ ग्रॅम वजनाचे एमडीएमए, एस्क्टासी हे अमली पदार्थ मिळून आले. या प्रकरणी तुलिंज पोलिसांनी एका नायजेरियन नागरिक ईदे इम्यानुवेल ईदे पॉल (वय २६) याला अटक करत एकूण ५८ लाख ७४ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.