बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेला आरोपी जेरबंद

बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेला आरोपी जेरबंद

नवी मुंबई, ता.३ (वार्ताहर) : पनवेल भागात बिबटयाची कातडी विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने सापळा लावून अटक करण्यात यश आले आहे. जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु (वय ३१) असे या आरोपीचे नाव असून गुन्हे शाखेने त्याच्याजवळ असलेली अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका येथे एक व्यक्ती बिबटया वाघाची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण फडतरे व त्यांच्या पथकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह गत मंगळवारी रात्री महामार्गावरील खारपाडा टोलनाका येथे सापळा लावला रचला होता. दरम्यान याठिकाणी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु हा संशयास्पदरित्या आढळला, यावेळी दबा धरुन बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात बिबटयाची कातडी आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडे बिबटयाची कातडी कुठून आणली, बिबटयाची शिकार कशाप्रकारे केली, याबाबत त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने त्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त केली. त्यानंतर जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु याच्या विरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सदर बिबटयाची कातडी आरोपीने कुठून आणली व तो सदर कातडी कुणाला विकणार होता, याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com